रोज ब्रेकफास्ट करा, फिट्ट अँड फाइन राहा

रोज ब्रेकफास्ट करा, फिट्ट अँड फाइन राहा

रात्री झोपेमध्येसुद्धा आपल्याला ऊर्जेची गरज लागते. झोपेतून उठल्यावर प्रातर्विधी आणि सकाळची कामं यामध्येही आपली उरलेली ऊर्जा खर्च होते. ही ऊर्जा भरून काढण्यासाठी आणि शरीराला पुन्हा ताजंतवानं करण्यासाठी सकाळचा नाश्ता किंवा ब्रेकफास्ट हा आपल्या दिवसभरातला महत्त्वाचा आहार असायला हवा.

न्याहारीचे काही फायदेः
• रात्रभर झोपेत आणि जेवणानंतर केलेल्या कार्यांमध्ये वापरली गेलेली ऊर्जा शरीराला कॅलरीच्या रूपात पुरवण्यात सकाळच्या न्याहारीचा मोठा वाटा असतो. त्या कॅलरीसोबतच प्रोटिन्स, व्हिटॅमिन, खनिजं, पाणी, तंतू, स्निग्धपदार्थ शरीराला पुरवले जातात.

• सकाळची न्याहारी हा आपल्या दिवसातला महत्त्वाचा आहार असतो. न्याहारी पोटभर केली असेल, तर आपल्याला दिवसभर थकवा जाणवत नाही. एखादे दिवशी नाश्ता केला नाहीत, तर दिवसभर चिडचिड होत राहते, कामात लक्ष लागत नाही, काही लोकांना उपाशी पोटी पित्ताचा त्रास जाणवतो, काही जणांना ग्लानी आल्यासारखं वाटत राहतं. हे सगळं व्हायचं कारण म्हणजे शरीरातली संपलेली ऊर्जा. या सगळ्या त्रासांपासून वाचण्यासाठी सकाळची न्याहारी करायलाच हवी.