देशातील सगळ्यात महागड्या चित्रपटाची पहिली झलक

देशातील सगळ्यात महागड्या चित्रपटाची पहिली झलक

मुंबई : भारतातील आजवरच्या सर्वात महागड्या म्हणजेच, तब्बल ४०० कोटी खर्च करून बनविण्यात येणाऱ्या '२.०' या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आज रिलीज करण्यात आलं. थेट थ्री डी शूटिंग झालेलं असल्यामुळं या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत, अॅमी जॅक्सन यांच्या भूमिका असून बॉलिवूडचा सध्याचा आघाडीचा अभिनेता अक्षयकुमार खलनायाकच्या भूमिकेत दिसणार आहे. '२.०'चे दिग्दर्शक शंकर व अभिनेत्री एमी जॅक्सन या दोघांनी पहिलं पोस्टर ट्विटरवर शेअर केलं आहे. त्यावर एमी जॅक्सन एलियनच्या रूपात दिसत आहे. 'जग फक्त मानवजातीसाठी नाही' असं या पोस्टरवर लिहिण्यात आलंय.

'२.०'साठी ४०० कोटींचं बजेट निश्चित करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यापैकी निर्मिती आणि मार्केटिंगवर आतापर्यंत १५० कोटी रुपये खर्च झाले आहेत. सर्वसाधारणपणे आधी चित्रपटाची शूटिंग होते मग त्याचं 'थ्री डी' रूपांतर केलं जात. मात्र, या चित्रपटाचं शूटिंगच थेट थ्री डी करण्यात आलं आहे. त्यामुळं हा चित्रपट खास असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे.