व्यापारी संकुलांमध्ये पोल माऊंटिंग डस्टबिन

व्यापारी संकुलांमध्ये पोल माऊंटिंग डस्टबिन

नाशिक  : ‘झिरो गार्बेज सिटी’ म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये आता व्यापारी संकुलांत कचरा कुंड्या दिसणार आहेत. त्यासाठी महानगरपालिकेने रीतसर निविदा प्रसिद्ध केली असून, त्यात कचरा संकलनासाठी ‘पोल माऊंटिंग डस्टब‌िन’ पुरवण्याचे दरपत्रक मागवले आहे. ११० लिटरचे हे डस्टबिन असणार असून, ते पोल वर उभे केले जाणार आहे. पण, ते फुल्ल झाले तर पुन्हा कचऱ्याचा प्रश्न समोर येणार आहे.

मुंबई, पुण्यासह देशातील सर्वत्र कचराकुंड्या व त्यातून बाहेर पडणारी घाण नेहमीच टिकेचा विषय असतो. पण, नाशिक महानगरात घंटागाडी आल्यानंतर कचरा कुंड्याच गायब झाल्या. घरात साठवलेला कचरा थेट घंटागाडीत अशी व्यवस्था केल्यामुळे हे शहर ‘झिरो गार्बेज सिटी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. कचरा संकलाची पद्धत व त्याचे नियोजन सूक्ष्म पद्धतीने महापालिकेने केल्यामुळे शहरात स्वच्छतेचा चांगला पायंडाही पडला व त्याचे कौतुकही झाले. पण, व्यापारी संकुल व व्यावसायिक ठिकाणांतील कचऱ्याचा विषय मात्र गांभीर्याने पुढे आला. या संकुलातील कचरा व घंडागाड्यांचे वेळेचे नियोजन फिसकटल्यामुळे अनेक जण हा कचरा कोठेही फेकू लागल्यामुळे त्याचा फटकाही बसला. काही व्यापारी संकुलांत घंडागाडी जाणे अवघड झाल्यामुळे हा प्रश्न तीव्रतेने समोर आला. त्यामुळे महानगरपालिकेने आता या संकुलांतील कचरा एकत्र करण्यासाठी ‘पोल माऊंटिंग डस्टब‌िन’ लावण्याचा निर्णय घेतला आहे.