गणेश मंडपांतूनही प्लास्टिक हद्दपार

गणेश मंडपांतूनही प्लास्टिक हद्दपार

प्लास्टिक हद्दपार करण्याचा निर्णय यंदा गणेशोत्सव मंडळेही गांभीर्याने घेणार आहेत. प्रसादासाठी आत्तापर्यंत प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. मात्र, यंदा अनेक लहानमोठी मंडळे ते टाळणार असून, मंडपातही प्लास्टिकच्या पिशव्या आणू न देण्याचे गणेशोत्सव मंडळांनी ठरवले आहे. 

माटुंग्याच्या जीएसबी सेवा मंडळाचा गणपती हा अनेक मंडळांसाठी आदर्श आहे. त्यामुळे पर्यावरणस्नेही पर्यायांचा वापर करून या मंडळाने इतरांनाही प्लास्टिकचा वापर टाळण्याचा सल्ला दिला आहे. हे मंडळ नारळ, मोसंबी, सफरचंद, केळी आणि सुका मेवा असा प्रसाद भक्तांना देते. हा प्रसाद साधारण तीन ते साडेतीन किलोचा होतो. यापूर्वी नॉनवुवन पॉलिप्रॉपिलीन पिशवीतून हा प्रसाद दिला जायचा. मात्र, यंदा त्यासाठी प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्या वापरण्यात येणार आहेत. या पिशवीची किंमत नेहमीच्या पिशव्यांपेक्षा अडीचपट आहे. तरीही पर्यावरणस्नेही पर्याय म्हणून कापडी पिशव्यांमधूनच प्रसादवाटप होईल, अशी माहिती मंडळाचे प्रवक्ते सतीश नायक यांनी दिली. 

'मोदक आणि पंचखाद्याच्या प्रसादासाठी यापूर्वी लहान प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत होता. यंदा त्यांच्याऐवजी बटरपेपरच्या पिशव्या आणि कार्डबोर्डचे खोके वापरण्यात येणार आहेत. प्लास्टिकच्या झिपलॉकच्या पिशव्यांपेक्षा या पिशव्या आणि खोक्यांची किंमत २५ टक्के अधिक आहे. मात्र, मोठ्या मंडळांनी प्लास्टिकबंदीचा नियम पाळला तर लहान मंडळेही स्वाभाविकपणे त्यांचे अनुकरण करून प्लास्टिकचे प्रदूषण कमी करण्यास मदत करतील', असा विश्वास नायक यांनी व्यक्त केला.