‘’सिनेमाला रामराम, लोकांची सेवा करीतच मरणार’’

‘’सिनेमाला रामराम, लोकांची सेवा करीतच मरणार’’

नवी दिल्ली - यापुढे तामिळनाडूतील जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात उतरणार असून आता यातून माघार नाही, असे दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांनी म्हटले आहे. यापुढे सिनेमातून काम करणार नसल्याचेही हासन यांनी सांगितले. माझ्या दोन येऊ घातलेले चित्रपट सोडले तर पुन्हा नवीन चित्रपटात काम करणार नसल्याचे कमल हासन यांनी सांगितले. बोस्टन येथील हॉवर्ड विद्यापीठात हासन बोलत होते. जर तुम्हाला अपयश आले तरीही राजकारणात राहणार का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. याचे उत्तर देताना कमल हासन म्हणाले, ''प्रामाणिकपणे राहणाऱ्या लोकांसाठी मला काहीतरी करायचे आहे. परंतु मी पराभूत होईन असे मला वाटत नाही.''

आपला आत्मविश्वास सांगताना ते पुढे म्हणाले, ''मी राजकारणात नव्हतो तरी मी गेली ३७ वर्षे समाजकारणात आहे. या ३७ वर्षात आम्ही १० लाख कार्यकर्त्यांना एकत्र केले आहे.''
''ते माझ्यासोबत ३७ वर्षे आहेत. माझ्या सल्ल्यानुसार जास्तीत जास्त तरुणांना सामाजिक कार्यासाठी एकत्र करण्यात यश आले असून यात २५० वकिलांचा समावेश आहे. सर्वजण स्वयंसेवक म्हणून काम करतात.

''मी कमवतो. मी इथे माझा बँक बॅलन्स वाढवण्यासाठी नाही. मी निवृत्त आयुष्य सुखात व्यथीत करु शकतो. मी राजकारणात आलोय कारण मला कलाकारा म्हणून मरायचे नाही. लोकांची सेवा करताना मरेन असे मी स्वतःला वचनबध्द केलंय.'', असेही हासन म्हणाले.