बॉलिवूडची भाजी मंडई झालीय!: धर्मेंद्र

बॉलिवूडची भाजी मंडई झालीय!: धर्मेंद्र

'सध्या बॉलिवूडची भाजी मंडई झालीय. भाजी मंडईत जशी भाज्यांची खरेदी-विक्री होते, त्याचप्रमाणे आजचे कलाकार पैशांसाठी काहीही करायला तयार आहेत. आजचे कलाकार पैशांसाठी कुठेही नाचतात, कुठेही गातात. मंडईतील भाज्यांप्रमाणे ते अगदी स्वत:ला विकायलाही तयार होतात,' अशी खरमरीत टीका अभिनेते धर्मेंद्र यांनी केली आहे. दिल्लीत एका वृत्तवाहिनीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना धर्मेंद्र यांनी बॉलिवूडच्या सद्य परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. 'सध्या बॉलिवूडची भाजी मंडई झालीय. आमच्या वेळी मात्र परिस्थिती अशी नव्हती. आमच्या काळी कलाकार पैशासाठी नव्हे, तर आवड म्हणून काम करत. परंतु, आज इंडस्ट्रीत दिखाऊपणा जास्त चालतो, असं ते म्हणाले. 'बॉलिवूडमधील पुरस्कार सोहळ्यांवरही त्यांनी टीका केली. पुरस्कार मिळवण्यासाठी लोक निरनिराळ्या कल्पना वापरतात, अनेकदा खालच्या पातळीवर जातात,' असंही ते पुढे म्हणाले. असं असलं तरी बॉलिवूडबद्दल वाटणारं प्रेम, जिव्हाळा त्यांनी लपवला नाही. 'माझ्यासाठी इंडस्ट्रीच माझी 'मेहबूबा' आहे आणि मी तिचा 'आशिक', असं ते म्हणाले.