संपूर्ण शैक्षणिक प्रगती एका कार्डवर

संपूर्ण शैक्षणिक प्रगती एका कार्डवर

ठाणे : महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा लेखाजोखा कम्प्युटराइझ पद्धतीने घेऊन त्या माहितीचे विश्लेषण करून विद्यार्थीनिहाय विविध उपाययोजना सुचवणारे महत्त्वकांक्षी अध्यापन संशोधन केंद्र उभारण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यानुसार प्राप्त माहिती स्टुडंट इन्फॉर्मेशन कार्डमध्ये संग्रहित केली जाणार आहे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्यापासून शालांत परीक्षेपर्यंतची सर्व माहिती या कार्डमध्ये संग्रहित केली जाणार आहे. 

शालेय विद्यार्थिनींना सर्वार्थाने सक्षम बनवण्यासाठी 'स्मार्ट गर्ल योजना' सुरू करण्यात येणार आहे. नव्या युगाचे कौशल्य शिकवणे, रोजगाराभिमुख सेवा क्षेत्रामध्ये तसेच पॅरामेडिकल क्षेत्राचे अभ्यासक्रम मुलींसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सत्यसाईबाबा संस्थांच्या मदतीने मुलींसाठी नर्सिंग आणि फार्मसीचे मोफत शिक्षण देण्याचाही प्रयत्न महापालिकेकडून करण्यात येणार आहे. शाळाबाह्य मुलांच्या समस्येवर उपाय म्हणून शहरामध्ये वस्ती शाळा सुरू करण्यात येणार आहेत. महापालिका शाळेतील ४ हजार विद्यार्थ्यांना टॅब पुरवण्याचाही प्रयत्न राहणार आहे.