अभ्यासक्रम बदलासह शिक्षकांना प्रशिक्षणही

 अभ्यासक्रम बदलासह शिक्षकांना प्रशिक्षणही

शैक्षणिक वर्ष २०१८-१९पासून दहावीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके मिळणार आहेत. कृतीयुक्त, उपयोजनात्मक असा हा अभ्यासक्रम असणार आहे. एप्रिलमध्येच विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर, शिक्षकांच्या प्रशिक्षणाची प्रक्रियाही सुरूच आहे. 

राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती देण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मागील वर्षी नववीचा अभ्यासक्रम बदलला, परंतु पुस्तके उशिरा आली. तर, यंदा एप्रिलमध्येच पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नवीन अभ्यासक्रम आल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येते. अनेकदा प्रशिक्षण जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येत होते. तसेच माध्यमनिहाय प्रशिक्षण वेगवेगळे घेतले जाते. यंदा शिक्षकांच्या प्रशिक्षणाचेही एप्रिलमध्येच नियोजन करण्यात आले आहे. त्यासह मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमांची प्रशिक्षणे एकत्रच होणार आहेत. मराठी व इंग्रजी माध्यमांची आठ राज्यस्तरीय केंद्र असणार आहेत. उर्दू माध्यमाकरीता दोन राज्यस्तरीय केंद्रे. औरंगाबादमध्ये जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसायिक विकास संस्थेत प्रशिक्षण होणार आहे. ५ ते १७ एप्रिल दरम्यान विषयनिहाय प्रक्रिया होणार आहे. शिक्षकांना प्रारंभी विभागीय. त्यानंतर जिल्हा आणि तालुकास्तरावर प्रशिक्षण असणार आहे. यामध्ये विद्या प्राधिकरण, बालभारती, शिक्षण संचालनालय, उपसंचालक कार्यालयाचा सहभाग आहे. त्यासाठी समन्वयकांची निवडही करण्यात येणार आहे.