पुस्तके झाली विद्यार्थीस्नेही!

पुस्तके झाली विद्यार्थीस्नेही!

आपल्या दैनंदिन जीवनात जे काही घडते त्याची उदाहरणे घेऊन अभ्यासक्रम रचला तर विद्यार्थ्यांना त्यामध्ये अधिक रस निर्माण होतो आणि यामुळे विद्यार्थी परीक्षार्थी न राहता तो खऱ्या अर्थाने ज्ञानार्थी घेतो. असाच प्रयत्न यंदा नव्याने प्रसिद्ध झालेल्या दहावीच्या पुस्तकांमध्ये करण्यात आला असून गणित विषयात जीएसटी, शेअर बाजार, म्युच्युअल फंड, प्राप्तिकर या संकल्पनांपासून ते कोरडवाहू शेतीच्या व्यवहारांपर्यंत अनेक उदाहरणे देण्यात आली आहेत. 

देशात शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यापासून शिक्षणात ज्ञानरचनावादाला विशेष महत्त्व देण्यात आले. ज्ञानरचनावादामध्ये शिक्षकांनी शिकविण्यापेक्षा विद्यार्थ्यांना शिकण्यात मदत करणे यावर विशेष भर देण्यात येतो. त्यानुसार यंदा इयत्ता दहावीचा नवीन अभ्यासक्रम तयार केला असून त्यात ज्ञानरचनावादाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्याच आधारे पुस्तकांची रचनाही करण्यात आली आहे. बुधवारी दादर येथील शिवाजी मंदिर सभागृहात या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. सर्व विषयांच्या पुस्तकांमध्ये विद्यार्थ्यांना कृतिशील शिक्षणावर भर देण्यात आला आहे. एखाद्या विषयावर संदर्भ शोधता यावे यासाठी विद्यार्थ्यांना इंटरनेटचा वापर करून काही माहिती शोधण्याचे या पुस्तकातून सूचित करण्यात आले आहे. याचबरोबर मागील इयत्तेमधील पाठाची उजळणी व्हावी म्हणून पाठाच्या सुरुवातीला काही प्रश्नही विचारण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचे मत मांडता यावे किंवा एखाद्या विषयावर त्यांचे मत तयार व्हावे यासाठी त्यांना काही प्रसंगांचे चित्र किंवा उदाहरणे देण्यात आली असून त्यावर विद्यार्थ्यांना त्यांचे मत नोंदविण्यास सांगण्यात आले आहे. असे विविध ज्ञानाधारित शिक्षणाला पूरक बदल यंदाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये करण्यात आले आहे.