आरटीई प्रवेश प्रक्रियेस सुरूवात

 आरटीई प्रवेश प्रक्रियेस सुरूवात

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या लॉटरीत शुक्रवारपर्यत ३७ हजार ९६४ मुलांनी प्रवेश घेतला. पहिल्या लॉटरीतून मुलांना प्रवेशासाठी शाळा जाहीर झाली; मात्र, शाळांनी प्रवेश नाकारल्यास त्या जागा पुढच्या फेरीत मुलांना प्रवेश घेण्यासाठी रिक्त ठेवण्यात येणार आहे, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यात आरटीई ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत शाळांच्या मुजोरीमुळे शिक्षण विभागाला प्रवेशासाठी वारंवार मुदतवाढ द्यावी लागत आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या लॉटरीतील प्रवेशासाठी १४ ते २४ मार्च मुदत दिली होती. मात्र, शाळांनी मुलांना प्रवेश नाकारल्याने पहिल्यांदा ही मुदत ४ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली. मुदत वाढवूनदेखील अपेक्षित प्रवेश न झाल्याने आणि अनेक मुलांना प्रवेश नाकारल्याने ४ ते १० एप्रिल अशी मुदतवाढ देण्यात आली. राज्यातील ठराविक नामांकित खासगी शाळांनी प्रवेश नाकारण्याचे धोरण अवलंबल्याने १० एप्रिलला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी १३ तारखेपर्यंत पालकांनी मुलांचे प्रवेश केले.

दरम्यान, आरटीई प्रवेश प्रक्रियेवरून ज्या ४१ शाळा न्यायालयात गेल्या आहेत, त्या शाळेत ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेशासाठी नाव जाहीर झाले आहेत, त्यांना वाद मिटल्यानंतर प्रवेश देण्यात येणार आहेत. तर, ज्या शाळा मुलांना प्रवेश नाकारात आहेत. त्यांच्या जागा पुढच्या फेरीत मुलांसाठी रिक्त ठेवण्यात येणार आहे, असे संचालनालयाचे उपसंचालक शरद गोसावी यांनी सांगितले. येत्या १३ तारखेपर्यंतची मुदतवाढ संपल्यानंतर सोमवारी १६ एप्रिल रोजी दुसरी फेरी किंवा पहिल्या लॉटरीला आणखी मुदतवाढ या संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.