प्लास्टिकबंदीसाठी शाळांचा पुढाकार

प्लास्टिकबंदीसाठी शाळांचा पुढाकार

राज्यात गुढीपाडव्यापासून लागू झालेल्या प्लास्टिकबंदीची शाळांमध्ये अंमलबजावणी होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिक पिशवी न आणण्याचे आवाहन केले आहे. 

विविध विशेष दिनांच्या निमित्ताने मुख्याध्यापक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्याशी संवाद साधत असतात. यंदा गुढीपाडव्याच्या निमित्ताने संवाद साधत असताना अनेक शाळांतील मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नका, असे आवाहन केले आहे. अनेक विद्यार्थी हे डब्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करतात. तर, परीक्षा काळात पॅड आणि कंपास बॉक्स आणण्यासाठीही पिशव्यांचा वापर करतात. हा वापर करण्याचे टाळावे, असे आवाहन मुंबईतील शाळांनी केल्याचे मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडिज यांनी सांगितले. 

पर्यावरण विभाग अथवा शालेय शिक्षण विभागाकडून शाळांना या निर्णयाबाबत सूचना आलेल्या नाहीत. असे असतानाही अनेक शाळांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून शाळांमधील प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी केल्याचेही रेडिज यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी जबाबदारीने प्लास्टिकचा वापर कमी केल्यास वर्तमानातील तसेच भविष्यातील प्लास्टिक वापराबाबत आपसूकच निर्बंध येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.