सीबीएसईच्या पुस्तकांसाठी ऑनलाइन पोर्टल

 सीबीएसईच्या पुस्तकांसाठी ऑनलाइन पोर्टल

शाळा सुरू होण्यापूर्वीपासून सुरू होणारी पुस्तक खरेदीची लगबग यंदा कमी होणार आहे. पुस्तकांच्या खरेदीसाठी शाळा, पालक यांची तारांबळ उडू नये, या उद्देशाने एनसीईआरटीतर्फे स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर पुस्तकातील अभ्यासक्रम, विविध प्रकाशने, पुस्तक विक्रेते तसेच एनसीईआरटीचे अधिकृत केंद्र आदी इत्थंभूत माहिती मिळणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) पुस्तकांसाठी विशेषत्वाने सुरू करण्यात आलेल्या पोर्टलमुळे पुस्तक खरेदी सोपी होणार आहे. 

शैक्षणिक सत्र २०१८-१९पासून या पोर्टलचा लाभ शाळा आणि पालकांनी घेता येणार आहे. निकालानंतर पुस्तकांसह शालेय साहित्याची खरेदी करण्यासाठी पालकांची धडपड सुरू होते. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी एनसीईआरटीने पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या पुस्तकाबाबतची संपूर्ण माहिती पोर्टलवर उपलब्ध असल्यामुळे पालक तसेच शाळा संपूर्ण चौकशीनिशी पुस्तक खरेदी करू शकणार आहेत. बरेचदा शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर पुस्तक प्रकाशनगृहाची समस्या उद्भवते. अभ्यासक्रम सारखा असूनही शाळेने सुचविलेल्या प्रकाशनगृहाचे पुस्तक नसल्यास विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. ही समस्या या पोर्टलमुळे संपणार आहे. शाळेने सांगितलेल्या अभ्यासक्रमाची खात्री करून घेण्याची सोयदेखील या पोर्टलवर उपलब्ध आहे. एनसीईआरटीच्या www.ncert.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यास पुस्तकांचे स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल तपासता येईल. यात सीबीएसई पुस्तकांची विक्री करणाऱ्या देशभरातील ८९५ वेंडरची यादी आहे. शिवाय तेरा राज्यांमधील अधिकृत केंद्रांची माहिती आहे.