मुंबई आयआयटीची सौरचूल प्रदर्शनात अव्वल

मुंबई आयआयटीची सौरचूल प्रदर्शनात अव्वल

आपला नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि संशोधनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या आयआयटी मुंबईने त्यांच्या शिरपेचात पुन्हा एकदा सोनरी तुरा रोवत ओएनजीसीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सौर चूल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. आयआयटी मुंबईच्या SoULS या टीमने ही कामगिरी बजाविली असून पारितोषिक म्हणून या टीमला १० लाख रुपये देण्यात आहेत. या १० लाखांच्या निधीतून एक हजार सौर चुली बनविण्यात येणार आहे. 

पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी महोत्सव निमित्त सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी ओएनजीसीतर्फे नुकतीच एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी १५००हून अधिक अर्जांची नोंदणी झाली होती. या स्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज सादर केल्यानंतर, दोन फेऱ्यांमध्ये त्यांची छाननी झाल्यानंतर तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षतेखाली २० टीम फायनल करण्यात आल्या होत्या. या समितीचे अध्यक्ष अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर होते. पुढच्या टप्प्यात सहा टीमची अंतिम फेरीत निवड करण्यात आली. त्यांनी ६ फेब्रुवारी रोजी आपले प्रेझेंटेशन सादर केले. या सहा टीममध्ये आयआयटी मुंबईने सर्वांचे लक्ष वेधत प्रथम क्रमांक पटकाविला असून त्यांना पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री यांच्या हस्ते गौरवण्यात आले.