चुकीच्या प्रश्नाचे सात गुण देणार

चुकीच्या प्रश्नाचे सात गुण देणार

बारावीच्या रसायनशास्त्राच्या (केमिस्ट्री) प्रश्नपत्रिकेतील चार प्रश्नांत चूक झाल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सात गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सात गुणांची खैरात होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दरवर्षी रसायनशास्त्राच्याच प्रश्नपत्रिकेतच कसा घोळ होतो, असा सवालही उपस्थित केला जात आहे. 

बारावीच्या परीक्षेदरम्यान २८ फेब्रुवारीला रसायनशास्त्राची परीक्षा होती. त्यामध्ये चार प्रश्नांमध्ये काही चुका असल्याचा दावा विद्यार्थी व पालकांनी केला होता, तसेच या प्रश्नांचे गुण सर्व विद्यार्थ्यांना दिले जावेत, अशी मागणीही केली होती. त्यानंतर मंडळातर्फे मुख्य नियंत्रकांची बैठक घेण्यात आली. या नियंत्रकांनी या चुका मान्य करून विद्यार्थ्यांना हे गुण देण्याची शिफारस मंडळाला केली होती. या पार्श्वभूमीवर मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी मंगळवारी रात्री या निर्णयाची माहिती दिली. 

'या परीक्षेमध्ये चार प्रश्नांमध्ये काही चुका होता. या चुका किरकोळ स्वरूपाच्या होत्या. मात्र, त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या मनात गोंधळ निर्माण होऊ नये; तसेच त्यांच्यावर अन्याय होऊ नये, यासाठी या विद्यार्थ्यांना सात गुण (या प्रश्नांचे पूर्ण गुण) देण्याची शिफारस नियंत्रकांनी केली होती. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे, किंवा त्याचा क्रमांक दिला आहे, त्याच विद्यार्थ्यांना त्यासाठीचे गुण दिले जाणार आहेत,' असे डॉ. काळे यांनी स्पष्ट केले.