भूगोलाच्या पुस्तकात देशाचा सदोष नकाशा

भूगोलाच्या पुस्तकात देशाचा सदोष नकाशा

'दहावीच्या नवीन पाठ्यपुस्तकात भारताचा सदोष नकाशा व राष्ट्रध्वज प्रकाशित करण्यात आला आहे. या पुस्तकातील भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीरचा मोठा भूभाग देशाच्या सीमेबाहेर दाखवण्यात आला असून, या गंभीर प्रकरणी सरकारने संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी', अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना गुरुवारी केली. 

विखे पाटील यांनी या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, 'महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता दहावीसाठी भुगोलाचे नवीन पाठ्यपुस्तक प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकातील प्रकरण ३ पान क्र. २४ वर भारताचा नकाशा प्रकाशित करण्यात आला आहे. परंतु, हा नकाशा चुकीचा असून, यामध्ये जम्मू व काश्मीरचा मोठा भाग भारताच्या हद्दीत दाखवण्यात आलेला नाही. या शिवाय प्रकरण २ पान क्र. ९वर भारताचा जो राष्ट्रध्वज प्रकाशित करण्यात आला आहे, त्यामध्ये अशोक चक्रासाठी निळा नव्हे, तर वेगळाच रंग वापरण्यात आल्याचे दिसून येते.' 'याप्रकरणी तज्ज्ञांशी चर्चा करून या पुस्तकातील चुका दुरुस्त कराव्यात आणि सध्याचे पुस्तक मागे घेऊन नवीन पुस्तक उपलब्ध करून द्यावे', अशी मागणीही विखे पाटील यांनी या पत्रात केली आहे.