शिपाईपदांची भरती; डॉक्टर, इंजिनीयर रांगेत

शिपाईपदांची भरती; डॉक्टर, इंजिनीयर रांगेत

मुंबई पोलीस दलातील १,१३७ पोलीस शिपाईपदांच्या भरतीसाठी दोन लाखाहून अधिक अर्ज आले आहेत. म्हणजे या भरतीतील एका पदासाठी साधारण १७५ उमेदवार इच्छूक आहेत. विशेष म्हणजे केवळ इयत्ता आठवी पास असलेल्यांसाठी असलेल्या या नोकरभरतीत आठवी, दहावी, बारावी आणि पदवीधरच नव्हे तर डॉक्टर, वकील, एमबीए आणि इंजिनीयर पदवीधारकांनीही पोलीस शिपाईपदासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

पोलीस शिपाईपदाच्या भरतीसाठी शारीरिक चाचणी घेतली जात आहे. रोज सुमारे ९ हजार अर्जदारांना नायगांवचे हुतात्मा मैदान, गोरेगांव पोलीस मैदान आणि घाटकोपरला चाचणीसाठी बोलावण्यात येत आहे. ८ एप्रिलपासून ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ८ मे रोजी ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचं सहपोलीस आयुक्त अर्चना त्यागी यांनी सांगितलं.