CBSE: १२वीची फेरपरीक्षा २५ एप्रिलला

CBSE: १२वीची फेरपरीक्षा २५ एप्रिलला

सीबीएसई बारावीच्या अर्थशास्त्र विषयाची फेरपरीक्षा २५ एप्रिल रोजी घेण्यात येणार असून दहावीच्या गणित विषयाची फेरपरीक्षा घ्यायची की नाही, याचा निर्णय येत्या १५ दिवसांत घेतला जाईल, असे आज केंद्रीय शालेय शिक्षण सचिव अनिल स्वरूप यांनी सांगितले. ही फेरपरीक्षा घ्यायची झाल्यास फक्त दिल्ली आणि हरयाणा या दोनच राज्यांत जुलै महिन्यात घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

अनिल स्वरूप यांनी बारावी अर्थशास्त्र आणि दहावी गणित या विषयांच्या फेरपरीक्षेची स्थिती स्पष्ट केली. दहावीच्या पेपरफुटीची चौकशी सुरू आहे. त्यामुळे ही चौकशी संपल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल. फेरपरीक्षा घ्यायची गरज आहे की नाही, यावर १५ दिवसांत आम्ही आमचा निर्णय जाहीर करू असेही त्यांनी सांगितले. दहावीचा गणिताचा पेपर दिल्ली आणि हरयाणा या दोनच राज्यांत फुटला होता. त्यामुळे गणित विषयाची फेरपरीक्षा झालीच तर ती या दोन राज्यांपुरतीच मर्यादित असेल, असे स्वरूप यांनी स्पष्ट केले. फेरपरीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास ही परीक्षा जुलैमध्ये घेण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचेही ते म्हणाले. 

पेपरफुटी प्रकरणाची द्विस्तरीय चौकशी सुरू आहे. एकीकडे पोलिसांचा तपास सुरू आहे तर दुसरकीडे अंतर्गत चौकशीही केली जात आहे, असे स्वरूप यांनी सांगितले.