मेरिट ट्रॅक कंपनीसाठी विद्यापीठाच्या निविदेतील अटींमध्ये बदल?

मेरिट ट्रॅक कंपनीसाठी विद्यापीठाच्या निविदेतील अटींमध्ये बदल?

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या ऑन स्क्रीन मार्किंगच्या सेवेसाठी (ऑनलाइन मूल्यांकनासाठी) निश्चित केलेली निविदेतील वार्षिक टर्नओव्हर रक्कम आणि तांत्रिक गुणात घट केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हे कंत्राट मिळवण्यासाठी आवश्यक असलेली १०० कोटींच्या टर्नओव्हरची अट असताना ही अट शिथिल करत ही मर्यादा ३० कोटींपर्यंत आणली गेली. शिवाय ७० गुणांऐवजी ६० गुण केल्याचेही माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. ही अट शिथिल केल्यामुळेच मेरिट ट्रॅक कंपनीला कंत्राट मिळाल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या ऑन स्क्रीन मार्किंगच्या सेवेसाठी टर्नओव्हर आणि तांत्रिक गुणात घट केल्यामुळेच मेरिट ट्रॅक कंपनीला अप्रत्यक्षपणे फायदेशीर ठरला आहे असेही त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची चौकशी करून तांत्रिक समितीच्या सदस्यांवर कारवाई करावी अशी मागणी गलगली यांनी राज्यपालांकडे केली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या केंद्रीय मूल्यांकन केंद्राने उपलब्ध करुन दिलेल्या कागदपत्राच्या आधारे स्पष्ट होत आहे की, एका विशेष कंपनीस लाभ मिळवून देण्यासाठी एकूण ४ वेळा निविदा जारी करण्यात आल्या होत्या. तिसरा देकार आला नसल्याचे पाहून डॉ. विजय जोशी यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक निविदा समितीचे गठन केले गेले. त्यावेळी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस या ठेकेदारांची गुणसंख्या ९५ एवढी भरली होती. तर, मेरिट ट्रक सर्विस प्रायव्हेट लिमिटेडची गुणसंख्या ४५ भरली होती. विशेष म्हणजे मेरिट ट्रक तांत्रिक निविदा बैठकीसाठी उपस्थित ही नव्हता. शिवाय या ठेकेदाराने संगणक प्रणालीचे सादरीकरण केलेच नाही अशी माहिती गलगली यांनी दिली आहे.