बीए फुल्ल, बीईची मात्र बत्ती गुल

बीए फुल्ल, बीईची मात्र बत्ती गुल

नागपूर विद्यापीठ संलग्नित ५६ इंजिनीअरिंग कॉलेजेसना यंदाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीअखेरपर्यंत केवळ ९५०० जागांवरच प्रवेश झाले असून, यंदा निम्म्याहून अधिक जागा रिक्त राहणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर बी.ए., बी.कॉम. व बी.एस्सी. या कोर्सेसची प्रचंड मागणी असल्याने विद्यापीठाला २० टक्के जागा वाढवून द्याव्या लागल्या आहेत. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांनी पारंपरिक कोर्सेसनाच पसंती दिली असल्याचे दिसून येते. 

महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या चारही राज्यांमध्ये तुलनेने सर्वाधिक इंजिनीअरिंग कॉलेजेस आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने गेल्यावर्षी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशभरात सुमारे सव्वा लाख इंजिनीअरिंग पदवीच्या जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यापैकी निम्म्या जागा या महाराष्ट्रातील होत्या, तर गुजरातमध्ये २४ हजार आणि तामिळनाडूतही १४ हजारांहून अधिक जागा शिल्लक होत्या. 

नागपूर विद्यापीठ संलग्नित ५६ इंजिनीअरिंग कॉलेजेसमध्ये सुमारे २१ हजार प्रवेशक्षमता आहे. गेल्या तीन वर्षांत सातत्याने आठ ते दहा हजार जागा रिक्त राहात आहेत. त्याचा फटका नव्या कॉलेजेसना बसतो आहे. परिणामी, अनेक कॉलेजेसनी त्यांच्याकडील काही ब्रान्चेस बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल यांसारख्या विषयांचा समावेश होता.