१६०० नव्हे, २३०० विद्यार्थ्यांना सरासरी गुण

१६०० नव्हे, २३०० विद्यार्थ्यांना सरासरी गुण

मुंबई : मुंबई विद्यापीठातील निकाल गोंधळ काहीही केल्या संपण्याचे नाव घेत नसून, आता १६०० नव्हे, तर २३०० विद्यार्थ्यांना सरासरी गुण द्यावे लागणार आहेत. खुद्द परीक्षा व मूल्यमापन संचालक अर्जुन घाटुळे यांनी बुधवारी ही माहिती दिली. या २३०० विद्यार्थ्यांच्या एकूण ३ हजार ७०० उत्तरपत्रिकांना सरासरी गुण देण्यात येणार आहेत. उत्तरपत्रिकांचे सरमिसळ होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे त्यावरून दिसून येत असून, या नव्या आव्हानाला विद्यापीठ प्रशासन कसे तोंड देते त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या एकूण २३०० विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात येणार असून, त्यांची विभागवार माहिती लवकरच वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झालेल्या नसून, त्यांची सरमिसळ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला परीक्षा मंडळाची मान्यताही मिळाली आहे, असे मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालासंदर्भात अधिक माहिती देताना डॉ. अर्जुन घाटुळे म्हणाले.

निकालाला उशीर झाल्याचे मान्य करतानाच, पुढील गोंधळ होऊ नये म्हणून नीट काळजी घेऊन निकाल जाहीर केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. तर पुनर्मूल्यांकनाच्या निकालाबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या असून, लवकरच त्याबाबत चौकशी करताना अंतिम निर्णयाची घोषणा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.