दुखापतीमुळे स्टार्क माघारी

दुखापतीमुळे स्टार्क माघारी

मुंबई/रांची: भारताविरुद्धच्या रांची कसोटीपूर्वीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क दुखापतीमुळे उर्वरीत कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. स्टार्कच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. आज सकाळी स्कॅनिंग करतेवेळी फ्रॅक्चर आढळून आल्याने, स्टार्क मायदेशी परतणार आहे. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीला रांचीमध्ये 16 मार्चपासून सुरुवात होणार आहे. चार सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. “स्टार्कच्या उजव्या पायाच्या दुखापतीने बंगळुरु कसोटीतच उचल खाल्ली होती. मात्र ही दुखापत बरी होईल अशी आशा होती. पण आज सकाळी स्कॅनिंग केली असता, फ्रॅक्चर आढळलं. त्यामुळे आता स्टार्कला विश्रांती घेण्याशिवाय पर्याय नाही”,असं ऑस्ट्रेलियन संघाचे फिजिओथेरपिस्ट डेव्हिड बेकली यांनी सांगितलं. या दुखापतीमुळे स्टार्क ऑस्ट्रेलियालापरत जाणार आहे. दरम्यान, स्टार्कच्या जागी कुणाला संधी मिळणार हे अद्याप ऑस्ट्रेलियन संघाने जाहीर केलेलं नाही. मात्र अतिरिक्त खेळाडू म्हणून दौऱ्यावर असलेल्या जॅक्सन बर्डला संधी मिळण्याची शक्यता आहे