नोटा आता प्लास्टिकच्याही

नोटा आता प्लास्टिकच्याही

पाचशे आणि एक हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयानंतर देशभरात निर्माण झालेला चलनकल्लोळ ताजा असतानाच आता प्लास्टिकच्या नोटा बाजारात आणण्याचा केंद्राचा विचार आहे. यासंदर्भात लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव सुरूही झाली असल्याचे केंद्र सरकारने संसदेत स्पष्ट केले आहे.


लोकसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना केंद्रीय अर्थराज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी प्लास्टिकच्या नोटांसंदर्भात माहिती दिली. ‘प्लास्टिकच्या नोटा छापण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यासंदर्भात लागणाऱ्या साहित्याची खरेदीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे’, असे मेघवाल यांनी स्पष्ट केले. प्लास्टिकच्या नोटांचा वापर वाढवण्यासंदर्भात रिझव्‍‌र्ह बँक आग्रही आहे. दहा रुपयांच्या एक अब्ज प्लास्टिकच्या नोटा छापून कोची, म्हैसूर, जयपूर, सिमला आणि भुवनेश्वर या शहरांत प्रायोगिक तत्त्वावर त्यांचा वापर करण्यात येईल, असे केंद्र सरकारने फेब्रुवारी, २०१४ मध्ये संसदेत स्पष्ट केले होते.