स्टेट बँकेच्या व्याजदरात वाढ

स्टेट बँकेच्या व्याजदरात वाढ

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या स्टेट बँकेने एक आणि दोन वर्षे कालावधीच्या एक कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात पाव टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या शिवाय दोन ते तीन वर्षे कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरही अंशत: वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढीव व्याजदराची अंमलबजावणी २८ मे पासून करण्यात येणार आहे. नव्या व्याजदरांचा ज्येष्ठ नागरिकांना फायदा होण्याची शक्यता आहे. 

सर्वसामान्य ग्राहकांना एक ते दोन वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर यापूर्वी स्टेट बँकेतर्फे ६.४० टक्के व्याज देण्यात येत होते. त्यावर आता सुधारित व्याजदराप्रमाणे ६.६५ टक्के दराने व्याज मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना यापूर्वी ६.९० टक्के दराने व्याज मिळत होते. मात्र, त्यांना आता ७.१५ टक्के दराने व्याज मिळणार आहे. दोन वर्षे ते तीन वर्षांपर्यंतच्या मुदतठेवींवर सर्वसामान्य ग्राहकांना ६.६५ टक्के दराने (यापूर्वीचा व्याजदर ६.६० टक्के) व्याज मिळणार आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना ७.१५ टक्के दराने व्याज मिळणार आहे. यापूर्वी ज्येष्ठांना ७.१० टक्के दराने व्याज मिळत होते. 
सात दिवसांपासून ४५ दिवसांपर्यंच्या मुदतठेवींवर बँकेतर्फे ५.७५ टक्के व्याजदर देण्यात येणार आहे. ४६ दिवस ते १७९ दिवसांसाठी ६.२५ टक्के, १८० दिवस ते २१० दिवसांसाठी ६.३५ टक्के दराने व्याज देण्यात येणार आहे. या शिवाय २११ दिवस ते एक वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी ६.४० टक्के, तीन वर्षांपासून ते पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींसाठी ६.७० टक्के आणि पाच ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी ६.७५ टक्के व्याज देण्यात येणार आहे.