पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करा: अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक दाखल

पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करा: अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक दाखल

न्युयोर्क: पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्याच्या मागणीला अमेरिकेत आता जोर धरू लागला आहे. पाकिस्तानसोबत अमेरिकेचे संबंध नेमके कशा प्रकारचे आहेत, हे स्पष्ट करावे आणि पाकिस्तानला दहशतवादी राष्ट घोषित करण्याची मागणी अमेरिकी काँग्रेसच्या खासदाराने केली आहे. यासंबंधीचे विधेयक त्यांनी अमेरिकी सिनेटमध्ये मांडले असून‘पाकिस्तान स्टेट स्पॉन्सर ऑफ टेररिझम अॅक्ट (एचआर १४४९)’ असे या विधेयकाचे नाव आहे. पाकिस्तान हा केवळ बेभरवशाचा सहकारी देश असून त्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून अमेरिकेच्या अनेक कट्टर शत्रूंनामदत करणे विनासायास चालू ठेवले आहे.

ओसामा बिन लादेनला स्वभूमीवर आश्रय देण्यापासून हक्कानी नेटवर्कशी असलेल्या जवळकीचे संबंध उघड आहेत. यावरून दहशतवादविरोधातील लढाईत पाकिस्तानची भूमिका स्पष्ट होते, असे अमेरिकी खासदार टेड पो यांनी म्हटले आहे. पाकिस्तानला करण्यात येणारी आर्थिक मदत बंद करण्याची हीच योग्य वेळ आहे आणि त्यांना दहशतवादाचा पुरस्कर्ता देश हे नाव द्यायला हवे, असेही पो यांनी म्हटले. नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ९० दिवसांच्या आत अहवाल सादर करून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय दहशतवाद रोखण्यासाठी कोणते सहकार्य दिले, याबाबत स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच त्यानंतरच्या ३० दिवसांत परराष्ट्रमंत्र्यांनी याच्या पाठपुराव्याचा अहवालही सादर करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. पाकिस्तानला जर दहशतवादाचा प्रायोजक देश घोषित केले नाही, तर ते कोणत्या कायद्यांतर्गत केले, असेही त्यांनी स्पष्ट करावे, असेही त्यांनी विधेयकात म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी झालेल्या उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर जी काही नाचक्की झाली आहे. तेव्हापासून पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी अमेरिकेत हालचालींना जोर आला आहे. अमेरिकी प्रतिनिधीगृहात सप्टेंबरमध्येही दोन खासदारांनी पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याची मागणी करणारे विधेयक सादर केले होते. आता सर्वांचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.