मोदी, पत्रकार आणि सेल्फी

मोदी, पत्रकार आणि सेल्फी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी राजधानीतील राष्ट्रीय पत्रकारांमध्ये यंदाही चढाओढ पाहायला मिळाली; पण मागील वर्षीप्रमाणे झुंबड काही उडाली नाही आणि धक्काबुक्कीचा प्रकारही झाला नाही.. निमित्त होते ते मोदी यांच्याबरोबरील ‘दीपावली मीलन’चे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भाजपने ही पद्धत सुरू केली आहे.
यंदाचे तिसरे वर्ष. भाजप मुख्यालयाला चिकटून असलेल्या ‘९, अशोका रोड’वर हा कार्यक्रम झाला. एरव्ही माध्यमांपासून फटकून राहणाऱ्या मोदींना भेटण्याची संधी ‘दीपावली मीलन’च्या निमित्ताने मिळत असल्याने मागील दोन्ही वर्षी पत्रकारांची तुंबळ गर्दी झाली होती. त्यातच तेव्हा सेल्फीची ‘क्रेझ’ असल्याने एकच झुंबड उडाली होती. धक्काबुक्कीचाही प्रकार झाला होता. तसा प्रकार टाळण्यासाठी भाजपने यंदा ‘शिस्तबद्ध रचना’ केली होती. त्यामुळे मोदींशी सर्वाना हस्तांदोलन करता आले, पण तेवढय़ा मुक्तपणे सेल्फी काढता आले नाही. पत्रकारांची संख्या मात्र जास्त होती. यावेळी मोदींचे छोटेखानी भाषण झाले. त्यात त्यांनी लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका एकत्र घेण्याबाबत देशभर चर्चा सुरू करण्याचे आवाहन केले.